राज्य शासनाच्या कार्यालयातील स्वच्छता व संचिका निपटारा मोहिम. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.४९/१८ (र. व का.) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : ०१ जुलै, २०२१
वाचा :
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०१८ / प्र. क्र. ९/१८ (र. व का.), दिनांक १५ फेब्रुवारी २०१८,
२) शासन परिपत्रक क्र. सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.१५६/१८ (र. व का.), दिनांक १९ ऑक्टोबर, २०१८.
परिपत्रक :
मंत्रालय तसेच राज्य शासनाच्या अनेक विभाग / कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आल्याने एक विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने वर नमूद दि. १९ ऑक्टोबर, २०१८ परिपत्रकाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
२. कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील प्रकरण ११ मध्ये अभिलेखन, अभिलेखांचे वर्गीकरण करणे, त्यांचे निंदणीकरण करणे व ते नष्ट करणे यासंबंधीच्या तरतूदी विहित करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यानुसार कार्यवाही करण्यासंबंधी मंत्रालयीन विभाग तसेच राज्य शासनाच्या सर्व विभाग / कार्यालयांना वेळोवेळी सूचित करण्यात आलेले आहे. तथापि सदर तरतूदींचे योग्यरित्या पालन केले जात नसल्याने अनेक विभाग / कार्यालयांमध्ये बंद करण्यात आलेल्या संचिका मोठ्या प्रमाणावर पडून असल्याचे व त्यामुळे अनेक कार्यालये अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य शासनाचे मुख्यालय मंत्रालय असून अशा महत्वाच्या इमातीमध्ये ठिकठिकाणी निरुपयोगी वस्तू / साहित्य वापरात नसलेले अभिलेख इत्यादी पडून आहे. त्यामुळे अशा साहित्याची विहित पद्धतीने विल्हेवाट लावून ही जागा रिकामी करुन उपयोगात आणणे आवश्यक आहे.
३. सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग /कार्यालये यांना पुन्हा सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांचे विभाग / कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने अभिलेखांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्ययावतीकरण करण्यासाठी एक विशेष मोहिम माहे जुलै, २०२१ मध्ये हाती घ्यावी. त्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” मधील सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
४. या मोहिमेअंतर्गत मंत्रालयीन विभागांनी त्यांच्याकडील अभिलेखांची छाननी करुन वर्गीकरण करावे. अनावश्यक अभिलेख नष्ट करण्यात यावेत. जतन करावयाचे अभिलेख, अभिलेख कक्षात पाठविण्यात यावेत अथवा असे अभिलेख विभागांनी त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयात जतन करण्यासाठी पाठवावेत.
५. ज्या अभिलेखांची आवश्यकता आहे असे अभिलेख विहित पद्धतीने व व्यवस्थितरित्या जतन करावेत.
६. मंत्रालय / शासकीय कार्यालयांतील उपहारगृहे / पॅट्रीज येथे स्वच्छता राहील याची दक्षता घेण्यात यावी.
७. वरील पद्धतीची कार्यवाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबविण्यात यावी.