Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » कार्यालयीन पोशाख

कार्यालयीन पोशाख

0 comment

सर्व शासकीय कार्यालया मध्ये काम करणा-या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी सल्लागार यांच्या साठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोषाखा संदर्भात ड्रेस कोड महार्दर्शक सूचना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०८-१२-२०२०

शासन परिपत्रक:-
महाराष्ट्र शासनांतर्गत मंत्रालय तसेच मंत्रालयाच्या अधिनस्त सर्व प्रकारची राज्य शासकीय कार्यालये येथून राज्य शासनाचा कार्यभार चालविण्यात येतो. ही सर्व कार्यालये राज्य शासनाचे जनमानसातील प्रतिनिधी म्हणून पाहण्यात येतात. या कार्यालयांमध्ये राज्यभरातील मा. खासदार, मा.आमदार/नगरसेवक इ. लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक, अन्य खाजगी संस्थांचे/आस्थापनांचे प्रतिनिधी/उच्चपदस्थ अधिकारी इत्यादी त्यांच्या कामासाठी भेट देत असतात. मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी हे कार्यालयास भेट देणाऱ्या संबंधितांशी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सुसंवाद साधतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे अधिकारी/कर्मचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची एक विशिष्ट छाप भेट देणाऱ्या अभ्यांगंतांवर पडते. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करीत असताना कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एकूण व्यक्तीमत्वाबद्दल तसेच वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही शासकीय कार्यालयास किमान अनुरुप ठरेल याची सर्वकष काळजी घेणे अभिप्रेत आहे.
तथापि, असे निदर्शनास आले आहे की, कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी/कर्मचारी (प्रामुख्याने कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती) हे कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्याला अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते. सर्व शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावरही होतो. या सर्व बाबी विचारात घेता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी (ज्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना विविध शासकीय परिपत्रकान्वये गणवेष नेमून देण्यात आले आहेत असे शासकीय कर्मचारी वगळता) यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत
पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. (अ) सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्यास शोभनीय असावा

(ब) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट / ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करु नये.
(क) यापूर्वीच्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनेनुसार खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.
(ড) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.
(इ) कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे विहीत नमुन्यातील कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे.
(ई) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्स चा वापर करु नये.
३. वरील सूचना या सर्व राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती यांनाही लागू राहतील. सर्व मंत्रालयीन विभाग तसेच अधिनस्त शासकीय कार्यालये/महामंडळ/उपक्रम यांनी त्यांच्याद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटी तत्वावरील अधिकारी/कर्मचारी तसेच व्यावसायिक सल्लागार यांनाही त्यांच्या शासकीय कार्यालयातील नियुक्तीच्या वेळेस या सूचना निदर्शनास आणाव्यात.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19828

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.