शासकीयकार्यालयातील अधिकायांना भेटण्यासाठी अभ्यांगतांना_निश्चित वेळ राखून ठेवणे बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक २७-०५-२०२३
परिपत्रक
मंत्रालयामध्ये अभ्यागतांना दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जात असल्यामुळे ते दुपारी दोन नंतर अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येतात. परंतु काहीवेळा अधिकारी बैठकीमध्ये गुंतलेले असल्यामुळे ते अभ्यागतांना भेटू शकत नाहीत. तसेच राज्य शासनाची धोरणे व विविध कल्याणकारी योजना राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा, विभाग अशा स्तरांवर राज्य शासनाची कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयांशी सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येत असतो. जनतेच्या तक्रारी समजुन घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करणे, शासनाच्या विविध योजना इत्यादींची माहिती देणे, इत्यादी कामे स्थानिक कार्यालयातील अधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनमानसांत लोकाभिमुख शासनाची प्रतिमा तयार होते. परंतू शासनाच्या असे निर्दशनास आले आहे की, जेव्हा लोक तक्रारी / गाऱ्हाणे घेऊन स्थानिक कार्यालयात जातात तेव्हा अधिकारी / कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. स्थानिक / जिल्हा /क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाचा आढावा घेणे, त्यांचे पर्यवेक्षण करणे, त्यावर देखरेख ठेवणे, इ. जबाबदाऱ्या असतात. त्यांना त्यासाठी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी द्याव्या लागतात. असे असले तरी, लोकांच्या तक्रारींची दखल घेणे, त्यांचे समाधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात.
१) मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी दुपारी २.३० ते ३.३० ही समान वेळ जनतेच्या भेटीसाठी राखुन ठेवावा व या कालावधीमध्ये शक्यतो विभागांतर्गत बैठकांचे आयोजन करण्यात येवू नये.
२) क्षेत्रिय पातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भेटीसाठी काही निश्चित वेळ राखुन ठेवावा. हा वेळ शक्यतो दुपारनंतर ठेवण्यात यावा.
३) या राखीव वेळात शक्यतो बैठकांचे आयोजन करण्यात येवू नये.
४) कर्तव्याचा भाग म्हणुन दौऱ्याचे आयोजन अशाप्रकारे करावे की, लोकांच्या भेटीसाठी राखुन ठेवलेल्या वेळेवर त्याचा परिणाम शक्यतो होणार नाही.
५) कर्तव्याचा भाग म्हणुन करावयाचे दौरे वा भेटी यासाठी आठवडयातील ठराविक दिवस निश्चित करावते व त्याची माहिती कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रदर्शित करण्यात यावे. म्हणजे जनतेस माहिती मिळाल्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही.
६) दौरे, भेटी यांच्या कालावधीत जर अधिकाऱ्यास कार्यालयात उपस्थित रहाणे शक्य नसले तरी त्याने जनतेच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
७) ज्या वेळेस दौरे / भेटी इ. कार्यक्रम नसेल त्यावेळेस जनतेसाठी राखुन ठेवलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असुन त्याचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.