शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपद्धती याबाबतचे धोरणामध्ये सुधारणा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०७-२०२१
वाचा :- १) शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही- २०११/ प्र.क्र.१३७/कार्यासन १२, दि.१७ डिसेंबर, २०१६
२) शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही- २०१६/प्र.क्र.५१०/ कार्यासन १२, दि.१६ फेब्रुवारी, २०१८
प्रस्तावना :-
शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीच्या कार्यपध्दती याबाबतचे धोरण संदर्भ क्र. १ व २ शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. मा. मंत्री (आस्थापना) यांच्या कार्यालयामध्ये विविध संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते. तथापि, महसूल विभाग वाटप नियमावलीनुसार वाटप झालेल्या महसूली विभागाबाहेर प्रतिनियुक्ती अनुज्ञेय नसल्याने येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रतिनियुक्ती धोरणात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
सदर शासन निर्णयाद्वारे संदर्भ क्र. १ येथील दि. १७/१२/२०१६ च्या शासन निर्णयातील परि. ५ (क) मध्ये पुढील मुद्दा क्र. (५) नव्याने अंतर्भुत करण्यात येत आहे.
” (५) प्रतिनियुक्ती धोरणानुसार वाटप करण्यात आलेल्या महसूली विभागाबाहेर अन्य महसूली विभागात प्रतिनियुक्ती अनुज्ञेय नाही. मात्र, शासन सेवेतील कोणत्याही संवर्गातील अधिकाऱ्यांची मंत्री आस्थापना तसेच मा. विधानसभा अध्यक्ष / उपाध्यक्ष, मा. विधानपरिषद सभापती / उपसभापती आणि मा. विरोधी पक्षनेता यांच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने नियुक्तीची मागणी झाल्यास, संबंधित अधिकाऱ्यास वाटप केलेला मूळ महसूली विभाग कायम ठेवून, उक्त आस्थापनेवरील मंजूर पदसंख्येच्या मर्यादेत प्रतिनियुक्ती अनुज्ञेय राहील. अशी कार्यवाही करताना, प्रतिनियुक्तीच्या धोरणातील अन्य अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी.
तथापि, सदर प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यास प्रतिनियुक्तीपूर्वी ज्या महसूली विभागात नियुक्ती दिली होती त्या महसूली विभागात, महसूली विभाग वाटप धोरणानुसार विहित केलेला किमान कालावधी पूर्ण करणे अनिवार्य राहील.”
२. सर्व प्रशासकीय विभाग व विभागप्रमुख यांनी प्रतिनियुक्तीने नियुक्ती देताना वरील आदेशाचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी.