शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत , महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागदिनांक 19.12.2018
शासन परिपत्रक क्रमांक- एसआरव्ही १०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ मधील परिच्छेद “(अ) प्रथम टप्पा खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदे भरतांना, गुणवत्तेच्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड यादी करावी (या ठिकाणी खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल). या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरीता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून समांतर आरक्षणास पात्र उमेदवारांपैकी केवळ खुल्या प्रवर्गाचेच आवश्यक पर्याप्त संख्येइतके उमेदवार घेणे आवश्यक आहे.”
या ऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावे
“(अ) – प्रथम टप्पा:- खुल्या प्रवर्गातील (अराखीव पदे) उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी. या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र., इ.मा.व. व एसईबीसी) समावेश होईल. या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरीता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येइतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे.”
शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शनार्थ स्पष्टीकरण ,महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग दिनांक 13.08.2014
(अ) प्रथम टप्पा : खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदे भरताना, गुणवत्तेच्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड यादी करावी (या ठिकाणी खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल. या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी केवळ खुल्या प्रवर्गाचेच आवश्यक पर्याप्त संख्येइतके उमेदवार घेणे आवश्यक आहे.”
(ब) दुसरा टप्पा :- त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात. (जे उमेदवार यापूर्वीच टप्पा “अ” मध्ये सामील झाले असतील त्यांना या यादीतून वगळावे.)
(क) तिसरा टप्पा : वरील “ब” नुसार तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये सामाजिक आरक्षणातील (Social Reservation) प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार “अ” येथे विशद केलेल्या कार्यपध्दतीनुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत. मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गांतर्गत रहावे.